Blogs, Stories & Official Reports

Explore our latest stories from the ground in Solapur, along with certified annual reports, financial statements, and public disclosures.

वेदनेचे शब्द..... आई सापडना ..!
News
19 Aug 2026

वेदनेचे शब्द..... आई सापडना ..!

"दाद्या... लगा आज आईला हुडकाला गिलतू, पण आई काय सापडली नाही लगा......" 😔 मम्मीला कुठं हुडकला... मोस सांगोला, आटपाडी, कराड करून आलो ... एका बापाने आपल्या सहा वर्षांच्या मुलासोबत फोनवर बोलताना उच्चारलेले हे शब्द अचानक आमच्या कानावर पडले... आणि ते शब्द ऐकल्यानंतर *काळीज चरकन चिरून जावं तशा वेदना मनामध्ये झाल्या. 💔 ही गोष्ट आहे एक महिन्यापूर्वी आमच्या प्रार्थना बालग्राममध्ये आलेल्या पाच वर्षांच्या लक्ष्मीची (नाव बदलले आहे) आणि तिच्या सहा वर्षांच्या भावाची... दाद्याची. एक महिन्यापूर्वी मी ऑफिसमध्ये बसलो होतो. तेव्हा एक गृहस्थ आपल्या *पाच वर्षांच्या मुलीला घेऊन ऑफिसमध्ये आले.* त्यांच्या दिसण्यावरून असं जाणवत होतं की ते दारू पिऊन आलेले आहेत. ते प्रकल्पावर आलेले बघून त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं आणि खुर्चीवर बसायला लावलं. सोबत असलेली ती चिमुकली मात्र नुसती आपल्या बापाचा हात धरून उभी होती... आणि *मधूनच गोड हसत होती.❤️ खुर्चीवर बसल्यावर त्यांनी आपल्या पिशवीतून आधार कार्ड काढलं, दणकण टेबलवर आपटलं आणि म्हणाले, "घ्या... हिला शाळेत टाकायचं हाय." एवढी लहान, गोंडस पोरगी बघितल्यानंतर मलाच प्रश्न पडला... काय करावं? मी त्यांना विचारलं, "का सोडायचं आहे?" तर ते म्हणाले, "घरी सांभाळायला कोण नाय... आय नाय हिची." मला थोडी शंका आली. त्यांची स्टोरी सविस्तर जाणून घेण्यासाठी मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांना विश्वासात घेतलं... आणि मग त्यांनी त्यांची स्टोरी सांगायला सुरुवात केली. "माझ्या बायकोला याड लागलय... कुठं बी येड्यासारखं फिरती. दोन लेकरांना घेऊन खाली तामिळनाडूला गेलती. तिकडं हुडकून मी परत घेऊन आलो. चाळीस-पन्नास हजार खर्च केला. डॉक्टरला बी दाखवलं... पण फरक काय पडणा?" "असंच कधी बी कुठं बी निघून जाती. एका डॉक्टरांनी तुमचा पत्ता दिला म्हणून तुमच्याकडं आलू. आता सध्या ती कुठं हाय मला माहिती नाय... अनं मी एका जाणाकडं साल गडी म्हणून राहतू." मग मी त्यांना म्हणलं, "मग दारू कशाला पिता तुम्ही? नीट राहायचं की..." त्यावर ते म्हणाले, "काय करावं सर... लय टेन्शन हाय. बायको बरी व्हावी म्हणून लय काय केलं... पण फरक काय पडणा..." क्षणभर थांबले... आणि लेकरांकडे बघत म्हणाले, "या लेकरांवर लई जीव हाय बघा... ही लेकरं तर चांगली शिकली पाहिजेत म्हणून तुमच्यापर्यंत आलूय." ❤️ संपूर्ण परिस्थिती ऐकल्यानंतर त्या पोरीला प्रार्थना बालग्राममध्ये ॲडमिशन द्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण ती राहील का नाही, यात आम्हाला शंका होती. पण त्या बापाने आम्हाला शब्द दिला होता... "माझी पुरगी लय हुशार हाय... हसत-खेळत राहती बघा. अन् शाळा म्हणलं की तिला तर लय आवडतय." आणि अगदी तसंच झालं... ती पोरगी कधी रडली नाही. कधी घराची आठवण काढली नाही. खूप हसत-खेळत राहते... ❤️ रोज शाळेला जाते... 📚 बापाचं मनं केलं कि कधीतरी तो फोन करतो. लेकरांची आठवण आली की दोन शब्द बोलतो.. आणि मग... त्या दिवशी आम्ही ऐकलं... "दाद्या... लगा आज आईला हुडकाला... गिलतू सांगोला, आटपाडी, कराड लय हुडकलं आरं... पण आई काय सापडली नाही लगा..." 😔 काळीज चिरणारे शब्द...! होय... भलेही तो दारू पीत असेल. कदाचित त्याच्याकडून चुका होत असतील. पण एक बाप म्हणून तो त्याचं कर्तव्य पार पाडतोय. पोरांना त्यांची आई पाहिजे म्हणून... कशीही असली तरी... कुठे आहे हे त्याला माहिती नसलं तरी... कशी आहे हे त्याला माहिती नसलं तरी... अजूनही तो तिला शोधतोय. दिवसभर काबाडकष्ट करून कमावलेला पैसा खर्च करतोय... फक्त आपल्या लेकरांसाठी... हे सगळं काही... एक बापच करू शकतो. ❤️‍🩹 "दाद्या... आई नाय सापडली लगा..." हे फक्त काही शब्द नव्हते... तो एका बापाच्या हतबलतेचा आवाज होता... आणि दोन लेकरांच्या आईला शोधणाऱ्या बापाच्या असहायतेचा आवाज होता... 😔 एक मात्र नक्की... या दोन्ही लेकरांचं भविष्य प्रार्थना बालग्रामच्या माध्यमातून नक्कीच उज्वल असेल. 🌱❤️ 🙏 धन्यवाद... विष्णू अविंदा नानासाहेब 📞 7038062114

Read Full Post